सूर्यग्रहण म्हणजे काय? ते केंव्हा होते?
जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. ज्या अमावस्येला चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा एका रेषेत येतात त्या अमावस्येला सूर्यग्रहण होते.
सूर्यग्रहणाचे प्रकार किती व कोणते?
1. खग्रास सूर्यग्रहण
2. कंकणाकृती सूर्यग्रहण
3. खंडग्रास सूर्यग्रहण
खग्रास सूर्यग्रहण
जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या सर्व बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय असे म्हणतात.
कंकणाकृती सूर्यग्रहण
जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळते. या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी दिसून येते. त्यालाच ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात. सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी ‘रिंग ऑफ फायर’, अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावे दिलेली आहेत. कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्रबिंबाचा आकार लहान असल्याकारणाने सूर्य संपूर्ण झाकला जात नाही. म्हणून डायमंड रिंग दिसत नाही.
खंडग्रास सूर्यग्रहण
या ग्रहणाचा, चंद्र पृथ्वीपासून किती अंतरावर आहे, याच्याशी संबंध नसतो. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. थोडक्यात ज्या सूर्यग्रहणात चंद्र हा सूर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही त्या सूर्यग्रहणाला खंडग्रास म्हणतात. कंकणाकृती हेदेखील खंडग्रासच आहे. फक्त यात संपूर्ण रिंग दिसते म्हणून हा प्रकार वेगळा गृहीत धरला जातो.
दि. 25 ऑक्टोबर 2022 च्या सूर्यग्रहणाविषयी
1. हे खंडग्रास प्रकारचे सूर्यग्रहण आहे.
2. या वर्षातील हे दुसरे सूर्यग्रहण आहे.
3. सूर्यग्रहण संध्याकाळी 4.49 वाजता सुरू होईल. पण ग्रहण संपण्याआधीच संध्याकाळी 6.08 ला सूर्यास्त होणार आहे. त्यामुळे ग्रहणातच सूर्यास्त होताना पहायला मिळणार आहे.
4. दुर्बिण किंवा द्विनेत्रीद्वारे तज्ज्ञ वगळता कुणीही ग्रहण पाहू नये. सूर्य ग्रहण पाहण्यासाठी सुरक्षित काळी वेल्डिंग काच, फिल्टर किंवा सुरक्षित चष्मा वापरावा. साध्या डोळ्यांनी कधीही ग्रहण पाहू नये. त्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो.