सालाबादप्रमाणे यावर्षी देखील भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात देशात सर्वत्र साजरा केला जात आहे. सर्वत्र याबद्दलची तयारीही चालू आहे. हा कार्यक्रम सर्व सरकारी कार्यालात तसेच शाळांमध्येही साजरा केला जातो. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणजे स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण स्पर्धा.
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण नमुना भाषण खालीलप्रमाणे देत आहोत.
स्वातंत्र्य दिन – मराठी भाषण क्र.2
माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीय शिक्षक वर्ग, येथे उपस्थित सर्व देश बांधवांनो. आज 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येकासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या मंगल दिनी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
उत्सव तीन रंगांचा आज सजला…नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला…
ब्रिटीशांच्या कित्येक वर्षाच्या जुलमी राजवटीतून देशातील हजारो स्वातंत्र्यवीरांनी एकत्रित येऊन स्वातंत्र्य संग्राम केला. महात्मा गांधीजी, जवाहरलालनेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यासारख्या नेत्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा भारतीयांचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या एकात्मतेसाठी शेकडो कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवाय तिरंगी झेंडा फडकविला जातो. शाळा कॉलेजमध्ये सणाचे वातावरण असते.
शालेय विद्यार्थी शुभ्र कपडे परिधान करून स्वच्छतेने व शिस्तीने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. देशभक्ती, देशप्रेम सर्वत्र दिसून येते. प्रभातफेऱ्या, ध्वजवंदन, वाद्यघोष, साहसप्रधान कवायती, मिरवणुका, जयघोष अशा गोष्टी स्वातंत्र्य दिनादिवशी पहावयास मिळतात. सर्वत्र गोड पदार्थांचे वाटप केले जाते. देशाची एकात्मता व नागरिकांतील राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यासाठी हा राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाचा सण कारणीभूत ठरतो.
एवढे बोलून मी माझ्या भाषणाला विराम घेते. जय हिंद जय भारत!