उतारा वाचन


बोधकथा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या.

बोधकथा क्र. 1 कोल्हा आणि कोंबडी

एक कोल्हा होता. तो एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात होता. तेवढ्यात एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तू बरी आहेस ना? तू बरेच दिवस आजारी असून घरातच झोपून आहेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत होता.

हे ऐकून कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. मी आजारी आहे. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण डॉक्टरने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हलण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून मला खाली यायला होत नाही. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील. तरी आता तू यावेळी जा.’

 

तात्पर्य – मर्यादेपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.

प्रश्न –

1) कोंबडी कोठे बसली होती?

2) कोंबडीची चौकशी कोणी केली?

3) कोंबडी खरंच आजारी होती का?

4) कोल्हा कोंबडीची स्तुती का करत होता?

5) वरील कथेमध्ये स्वार्थी कोण आहे?

बोधकथा क्र. 2 अति तिथे माती

एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांकडे भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की ‘तू गावाबाहेर नदीकाठी देवाची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल’. तो त्याप्रमाणे करतो. देव प्रसन्न होतो.

देव त्याला म्हणतो, ‘तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईन. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. ‍ तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो.

त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर नदीकाठी जातो. देवाला प्रसन्न करतो. देव त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर देवही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.

तात्‍पर्य: कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.

प्रश्न :

1) भिकारी भिक कोणाकडे मागायचा?

2) त्याने देवाला प्रसन्न कसे केले?

3) भिकारी झोळीत मावेल तेवढेच पैसे का घेतो?

4) त्याने मिळालेल्या पैश्याचे काय केले?

5) दुसऱ्या माणसाला पैसे का मिळत नाहीत?

वरील बोधकथा PDF मध्ये DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

ही पोस्ट शेअर करा...